सध्या देशातील प्रत्येक जनता कठीण प्रसंगाला सामोरी जात आहे. करोना विषाणूचं सावट असल्यामुळे एकीकडे नागरिकांच्या मनात भीती आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु या काळात देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातली कर्मचारी जीवाची परवा न करता काम करत आहेत. यात अनेक वेळा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्षही होत आहे. त्यामुळेच अभिनेता सलमान खानने जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या मुंबई पोलिसांमध्ये सॅनिटायझरचं वाटप केलं आहे.

करोनाला हरवायचं असेल तर शारीरिक स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे, हे साऱ्यांनाच ठावूक आहे. हात स्वच्छ ठेवणं हे या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक जण सॅनिटायझर विकत घेण्यावर जोर देत आहे. एकाच वेळी सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात त्याच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे सलमान खानने त्याच्या ‘फ्रेश’ (FRSH) या कंपनीत तयार करण्यात आलेले सॅनिटायझर प्रथम पोलिसांमध्ये वाटले आहेत. भाईजानने केलेल्या या कामामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


अलिकडेच सलमान खानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरु केली असून या कंपनीत तयार झालेले सॅनिटायझर त्याने मुंबई पोलिसांना भेट म्हणून दिले आहेत. लॉकडाउनच्या काळात घरी राहून सलमानने ही नवीन कंपनी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, सलमानच्या फ्रेश या ब्रॅण्डचे प्रोडक्ट्स लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सॅनिटायझरची सर्वाधिक गरज असल्यामुळे फ्रेश सॅनिटायझर बाजारात उपलब्ध झालं आहे.