टीआरपीच्या शर्यतीत मागे पडत चाललेल्या दी कपिल शर्मा या शोला अभिनेता सलमान खानने आधार दिला होता. अभिनेता सलमान खान कायमच अडचणीत असलेल्यांना मदत करतो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे कपिलसाठी देखील भाईजानने मदतीचा हात पुढे केला होता. सलमानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कपिलच्या आगामी शोची निर्मिती केली. या निर्मितीनंतर सलमान पुन्हा एकदा एका नव्या मालिकेची निर्मिती करणार आहे. सलमान लवकरच कुस्तीपटू गामा पहेलवान यांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार आहे.
या मालिकेमध्ये अभिनेता सोहेल खान आणि मोहम्मद नजीम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सलमानच्या बॅनरखाली बनणाऱ्या टीव्ही मालिकेमध्ये सोहेल खान गामा पहेलवान यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचं दिग्दर्शन पुनीत इस्सार करत असल्याचं ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
लंडन आणि पंजाबमध्ये चित्रीत होणारी मालिका एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आहे. विशेष म्हणजे मालिकेपूर्वी सलमान या कथानकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र तशाच धरतीवर आधारित एका चित्रपटाची अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट येणार आहे. त्यामुळे सलमानने मालिकेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
गामांचा जन्म १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज असे होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली होती. नंतर १९ वर्षांचे असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्तीपटू रहीम बख्श सुलतानीवाला यांना त्यांच्यासोबत खेळण्याचे आव्हान दिले होते. आश्चर्य म्हणते ते आव्हान गामा जिंकलेही होते. या कुस्तीनंतर गामांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 12:29 pm