बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला एखादा प्रश्न माध्यमांनी केला की त्याचं उत्तर मिळालंच समजा. एकतर हा भाईजान त्या प्रश्नाचं सरळ उत्तर तरी देईल किंवा उलटसुलट प्रश्न करून समोरच्यालाच बुचकळ्यात टाकेल. मात्र, काहीही झालं तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडून मिळणारच. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचे प्रमोशन करत असून, तो सतत प्रसार माध्यमांना समोरा जात आहे. नेहमीच मनोरंजन विश्वातील बातम्यांमध्ये टॉपवर असणारा सलमान आताही त्याने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामुळे चर्चेत आला आहे. मध्यंतरी त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेले उत्तर दंग करणारे होते. खरं तर हा आमिरला एक प्रकारचा टोमणाच होता असं म्हटलं जातंय.

वाचा : …आणि शाहरुखने सलमानला ‘बेबीसिटिंग’च्या कामाला लावलं

सलमान लग्न कधी करणार? हा जणू काही राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. बॉलिवूडमधील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असलेल्या या अभिनेत्याचं आजवर अनेक अभिनेत्रींसह नाव जोडलं गेलंय. ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान आमिर खाननेही आपल्या मित्राच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. मी सलमानचे हातपाय बांधून त्याचे लग्न लावून देणार असल्याचे आमिर म्हणाला होता. त्यावर आता सलमाननेही आमिरच्याच शैलीत उत्तर देताना म्हटले की, ‘होय, मी आमिरचे वक्तव्य कुठे तरी वाचलं होतं. आमिरने माझ्याविषयी असेच काहीसे म्हटले होते. तो माझे हातपाय बांधू इच्छितो, जेणेकरून तो माझं लग्न लावू शकेल. त्याच्या या वक्तव्याविषयी मी एवढंच बोलू इच्छितो की, मीदेखील त्याचे हातपाय बांधून ठेवणार आहे. जेणेकरून तो तिसऱ्यांदा लग्न करू शकणार नाही.’ सलमानचा नेहमीचा खोडकर अंदाज सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आमिर त्याच्या मित्राच्या या वक्तव्याकडे कानाडोळा करतोय की त्याचं बोलणं मनावर घेतोय ते येणारी वेळच सांगेल.

वाचा : ..’त्या’ रिक्षावाल्याला सलमानने दिलं इतकं भाडं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच २३ जूनला प्रदर्शित होणार आहे. यात चीनी अभिनेत्री झू झू, सलमानचा छोटा भाऊ सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या भूमिका आहेत. बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचीही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झलक पाहावयास मिळणार आहे.