बॉलिवूडचा बजरंगी भाईजान याचा फॅनफॉलोअर्स प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सलमानच्या प्रत्येक गोष्टीला त्याचे चाहते फॉलो करत असतात. आतापर्यंत सलमानच्या प्रत्येक चित्रपटातील काही ना काही गोष्टी चांगल्याच गाजल्या आहेत आणि याच गाजलेल्या गोष्टी कालांतराने ट्रेंड म्हणून सर्वत्र प्रचलित झाल्या. त्यातलाच सलमानचा ‘शर्टलेस’ हा ट्रेंड प्रसिद्ध झाला आहे. इतकंच नाही तर अजूनही त्याच्या काही चित्रपटांमध्ये त्याचा एकतरी शर्टलेस सीन येतोच आणि त्याचा हा सीन प्रचंड गाजतो. मात्र हा शर्टलेसचा ट्रेंड कसा सुरु झाला हे कोणालाच माहित नाही.

सलमान १९९८ साली ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटामध्ये ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यासाठी शर्टलेस झाला होता. त्यानंतर मात्र  आतापर्यंत त्याच्या अनेक चित्रपटामध्ये तो शर्टलेस झाल्याचं दिसून आलं. इतकंच नाही अन्य काही कलाकारांनीही हा ट्रेंड आत्मसात केला होता. १९९८ साली सुरु झालेला हा ट्रेंड ‘रेस ३’ पर्यंत सुरुच आहे. परंतु शर्टलेसचा हा ट्रेंड एका विशिष्ट कारणामुळे सुरु झाल्या असून खुद्द सलमानने या कारणाचा खुलासा केला आहे.

‘ओ ओ जाने जाना’ या गाण्याचं चित्रीकरण मड आयलॅडवर झालं असून या गाण्यासाठी सलमानला जे कपडे देण्यात आले होते. ते त्याच्या मापापेक्षा लहान होते. यामुळे सलमानला शर्टाची बटणदेखील लावता येत नव्हती. त्यामुळे नवीन शर्ट आणण्यासाठी डिजाइनर दुसरा शर्ट आणण्यासाठी गेला.मात्र तो येईपर्यंत ४ तास उलटून गेले होते. त्यातच उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे एवढ्या कडक उन्हात शर्टाशिवाय बसणं सलमानला कठीण जात होतं. त्यामुळे हे गाणं शर्टाशिवाय चित्रीत करण्याचा निर्णय सलमानने घेतला आणि त्याने त्याचं मत चित्रपट दिग्दर्शक सोहेल खान याच्याकडे मांडलं.

सलमानने मांडलेल्या या मतावर त्याने पुन्हा विचार करावा असं सोहेलने त्याला सांगितलं होतं. मात्र आपण शर्टलेस होऊन चित्रीकरण करण्यास तयार असल्याचं सलमाननं सांगितलं आणि या गाण्यासाठी सलमान शर्टलेस झाला. दरम्यान,  सलमानच्या या एका निर्णयामुळे हे गाणं तुफान गाजलं आणि येथूनच शर्टलेसचा ट्रेंड सुरु झाला.  १९९८ मध्ये सुरु झालेला हा ट्रेंड आता ‘रेस ३’ पर्यंत अजूनही सुरुच आहे.