बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचे चाहते जगभरात आहेत हे नव्याने सांगायला नको. त्याची झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमासाठी जरी त्याने हजेरी लावली तरी त्याला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची चढाओढ सुरू असते. आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त सलमान सध्या दुबईत आहे. शूटिंगदरम्यानच्या फावल्या वेळेत तो तिथल्या एका मॉलमध्ये गेला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या मॉलमध्ये फिरणाऱ्या सलमानला कोणी ओळखलंच नाही.

इन्स्टाग्रामवर सलमानच्या एका फॅन पेजवर यासंदर्भातला व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत सलमान मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. त्याच्यासोबत अंगरक्षकसुद्धा आहेत. मॉलमध्ये बिनधास्त फिरणाऱ्या सलमानच्या आजूबाजूला चाहत्यांचा गराडाच नाही आहे, किंबहुना कोणी त्याला ओळखलंच नाही. फिरत फिरत तो तिथल्या एका खुर्चीवर बसला आणि आपल्या फोनमध्ये व्यग्र झाला. मॉलमध्ये मुक्तपणे वावरत असताना सलमानला कोणीच कसं ओळखलं नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून पडला आहे.

https://www.instagram.com/p/BlPYGvEne2c/

सलमानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाची शूटिंग दुबईत सुरू आहे. अली अब्बास दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. जवळपास दहा वर्षांनी हे दोघे एकत्र झळकणार आहेत.