बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला ‘दबंग’ या चित्रपट मालिकेने आणखी लोकप्रिय केले. या फिल्म सीरिजमध्ये सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. ‘दबंग’ला मिळालेले तुफान यश पाहाता आता या सीरिजचे अ‍ॅनिमेटेड वर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेषत: लहान मुलांच्या आग्रहाखातर ‘दबंग’ला अ‍ॅनिमेडेट फॉर्ममध्ये तयार करण्याचा निर्णय घेतला असं अरबाज खानने सांगितलं.

‘दबंग’ सीरिजचे दिग्दर्शन सलमानचा भाऊ अरबाज याने केले आहे. एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने दबंगच्या अ‍ॅनिमेटेड अवताराचा उल्लेख केला. तो म्हणाला, “दबंग ही अत्यंत लोकप्रिय सीरिज आहे. सध्या या सीरिजच्या अ‍ॅनिमेटेड फॉर्मवर आम्ही काम करत आहोत. विशेषत: लहान मुलांसाठी या सीरिजची निर्मिती केली जात आहे. लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून आम्ही चुलबुल पांडेचा गंमतीशीर विनोदी अवतार प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. सध्या तरी या सीरिजमध्ये ७२ भाग असतील. पुढे प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहुन मालिका आणखी वाढवली जाईल.”

‘दबंग’ ही सलमानच्या करिअरमधील सर्वाधिक लोकप्रिय फिल्म सीरिज आहे. या सीरिजमध्ये आजवर एकून तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजने जवळपास ७०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटांमधील सलमानचा चुसबुल पांडे अवतार प्रेक्षकांना खुपच आवडला.