‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी’ चित्रपटातील सहायक अभिनेता सॅम रॉकवेलने ९० व्या ऑस्कर पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता’ या पुरस्कारावर आपले नाव कोरले. सॅमने पटकवलेला हा त्याच्या सिनेकारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट सह्हायक अभिनेता या गटात ‘विलिएम डफो’, ‘वूडी हारेलसन’, ‘रिचर्ड जेनकिन्स’ हे इतर तीन स्पर्धक होते. तीनही स्पर्धकांमध्ये अतितटीची लढत होती यांतील प्रत्येक कलाकाराने आपली कलाकृती सादर करताना त्यात अक्षरश: जीव ओतून सिनेमातील व्यक्तिरेखा जिवंत केली पण या साऱ्यांमध्ये ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी’तील सॅमची भूमिका उजवी ठरली.
सॅम रॉकवेल सहायक अभिनेता जरी असला तरी देखिल त्यातील मुख्य पात्रांवर वरचढ ठरणारा अभिनय त्याने चित्रपटात सादर केला आहे. संपूर्ण सिनेमा त्याच्याच भोवती फिरावा इतका तो भूमिकेशी एकरुप झालेला दिसतो. १९८९ पासुन कार्यरत असलेल्या सॅमची कारकिर्द फार मोठी आहे.
त्यामुळे या ऑस्कर स्पर्धेतील एक अनुभवी खेळाडू म्हणुन त्याच्याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. पण कोणत्याही पूर्वग्रहाला बळी न पडता अभिनयावरची त्याची पकड, भूमिकेचा अभ्यास, चित्रपटातील त्याच्या बारीकसारीक हालचाली ह्या वाखाण्याजोग्या आहेत. चित्रपटाच्या आशयातील साधेपणा त्याच्या सादरीकरणात परावर्तीत झालेला दिसतो. थोडक्यात काय तर उत्कृष्ट अभिनयाचे सुरेख प्रदर्शन सॅम रॉकवेलने केल्यामुळेच तो सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.