नव्या वर्षांत बॉलीवूडचा विचार करताना ‘अमिताभ बच्चन’ हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागणार आहे. २०१४ मध्ये छोटय़ा पडद्यासाठी ‘बिग बी’ ठरलेल्या अमिताभ बच्चन यांना मोठय़ा पडद्यावर फारसा करिश्मा दाखवता आला नव्हता. या वर्षी तीन समकालीन आणि वेगळ्या विषयांवरचे चित्रपट अमिताभ यांच्या हातात आहेत. एकीकडे अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिग्गज अभिनेता ‘शमिताभ’सारख्या समकालीन विषयांकडे प्रयोगशीलतेने पाहणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना दिसणार आहेत, तर दुसरीकडे रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि सुशांतसिंग राजपूत यांच्यासारखी तरुण फळी ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘बाजीराव मस्तानी’सारख्या ऐतिहासिक किंवा ‘पीरियड फिल्म्स’मधून दिसणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘शमिताभ’ हा सर्वासाठी उत्सुकता असलेला चित्रपट २०१५ चे शुभारंभाचे आकर्षण ठरणार आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेता धनुष पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. अभिनेता कमल हसन यांची दुसरी मुलगी अक्षरा हसनही या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणार असून अभिनेत्री रेखाची छोटेखानी भूमिका हेही या चित्रपटाचे आक र्षण असणार आहे. अमिताभ आणि रेखा या एकाच चित्रपटात दिसणार असले तरी ते ‘एकत्र’ दिसणार आहेत की नाही, या प्रश्नाच्या उत्तरासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शूजित सिरकार दिग्दर्शित ‘पीकू’ हा अमिताभ यांचा दुसरा चित्रपटही चर्चेत आहे. ‘पीकू’साठी अमिताभ यांचा लुक बदलण्यात आला आहे. वडील आणि मुलीच्या नात्याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबर दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. अमिताभ- दीपिका- इरफान खान ही वेगळी तिहेरी जोडी या चित्रपटाचे बलस्थान आहे. या वर्षीचा तिसरा वेगळा चित्रपटही अमिताभ यांच्याभोवतीच फिरतो आहे. ‘वजीर’ या चित्रपटात अमिताभ आणि फरहान अख्तर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
ऐतिहासिक पट आणि पीरियड ड्रामा हे नव्या वर्षांचे नवे समीकरण नव्या फळीतील कलाकारांनी उचलले आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’ हा या यादीतला पहिला चित्रपट असेल. नव्या वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या आत झळकणारा हा चित्रपट रणबीर कपूरसाठी खास आहे. इतिहासकार ग्यानप्रकाश शर्मा यांच्या ‘मुंबई फेबल्स’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात बॉक्सर जॉनी बलराज (रणबीर) आणि जॅझ गायिका रोझी (अनुष्का शर्मा) यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ‘बेशरम’मधून सपाटून मार खाल्लेल्या रणबीरला आपली कारकीर्द उंचावण्यासाठी या चित्रपटाची गरज आहे. कतरिनाबरोबरचा ‘जग्गा जासूस’ हा त्याच्या होम प्रॉडक्शनचा पहिलाच हलकाफुलका चित्रपट वर्ष संपता संपता प्रदर्शित होईल. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण जोडीचा ‘बाजीराव मस्तानी’ हा ऐतिहासिक पटही २०१५ च्या बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर, दीपिका आणि प्रियांचा चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित सुशांतसिंग राजपूतचा ‘ब्योमकेश बक्षी’ हा चित्रपट पीरियड फिल्म्सच्या यादीतले आणखी एक आकर्षण ठरेल.
याशिवाय, ‘भाई’ सलमान खान कित्येक वर्षांनी पुन्हा सूरज बडजात्यांच्या कौटुंबिक ‘प्रेम’पटात दिसणार आहे. सोनम कपूरबरोबर ‘प्रेम रतन धन पायो’ आणि करीनाबरोबर ‘बजरंगी भाईजान’ हे त्याचे मोठे चित्रपट आहेत. तर शाहरुखने या वर्षी पुन्हा एकदा यशराज बॅनरबरोबर सूत जुळवले असून मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅ न’ आणि ‘रईस’ हे शाहरुखचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.