बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे ‘खुल्लमखुल्ला’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्याच्या या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटनांचा खुलासा झाला आहे. या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटना समोर येत असताना आता संजय दत्त आणि  ऋषी कपूर यांच्यातील वाद टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटनेला बॉलिवूडमध्ये  नेहमीच  खलनायकाची भूमिकेत दिसणाऱ्या ग्रोवर याने उजाळा दिला आहे. टीना मुनीमसोबतच्या प्रेम प्रकरणा दरम्यान संजय दत्तच्या मनात  ऋषी कपूर याच्यांबद्दल राग निर्माण झाल्याची घटना गुल्शन ग्रोव्हरने डिएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली.  अविवाहित ऋषी कपूर टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संजय दत्तला वाटत असल्यामुळे संजू बाबाने टोकाचा विचार केला होता, असे ग्रोवर यावेळी  म्हणाला.

संजय दत्त आणि टिना मुनीम यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. त्यावेळी ऋषी कपूर यांच लग्न झाले नव्हते. संजय दत्त याला संशय होता की, ऋषी कपूर हा टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. असे गुल्शन ग्रोवरने डिएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. तो म्हणाला की,  मी आणि संजय भावांसारखे होतो.  संजय दत्तने  मला सांगितले की, ऋषी कपूरला धडा शिकवायचा आहे. त्यानुसार ऋषी कपूरला मारण्यासाठी आम्ही दोघेही ऋषी कपूरच्या घरी गेलो. पण ॠषी कपूरला मारण्याआधी नितू आम्हाला भेटली आणि तिने ऋषी कपूरचे आणि टीना यांच्यामध्ये कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संजूबाबाचा राग निवळला आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही दिवसांनी ऋषी कपूर आणि नितू विवाहबंधनात अडकले होते.

कपूर आणि दत्त कुटुंबियांमध्ये फारसे चांगले संबंध नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेली राज कपूर आणि नर्गिस यांची एकमेवाद्वितीय प्रेमकथा. आजही संजय दत्त किंवा त्यांच्या कुटुंबियांबद्दल कपूर खानदानात कोणाला विचारणा झाल्याचे ऐकिवात नाही. आणि झालीच असेल तर कपूर कुटुंबियांनी कधीही अशा प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. यानंतरही संजू बाबाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये  ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणबीरने  या भूमिकेसाठी दिलेला होकार हा इतरांनाच नव्हे तर त्याच्या घरच्यांनाही आश्चर्यचकित करणारा होता. रणबीरने मात्र हा चित्रपट आणि विशेष म्हणजे संजय दत्तची भूमिका करण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच पार पडला असून पहिल्या दिवशी संजय दत्तही चित्रपटाच्या सेटवर जाऊन आला आहे. लवकरच संजू बाबाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.