बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली. अशातच काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्विट करत बॉलिवूड इंडस्ट्रीला प्रश्न विचारला आहे.

संजय निरुपयम यांनी ट्विटमध्ये ‘छिछोरे’ हिट झाल्यानंतर सुशांतकडे सात चित्रपट होते. पण सहा माहिन्यांमध्येच त्याच्या हातून हे चित्रपट निघून गेले. पण का? असा प्रश्न त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला विचारला आहे.

‘छिछोरे चित्रपट हिट झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतने सात चित्रपट साइन केले होते. सहा महिन्यातच त्याच्याकडून ते चित्रपट गेले. का? फिल्म इंडस्ट्रीमधील निष्ठुरता एका वेगळ्याच पातळीवर काम करते. याच निष्ठुरतेने आज एका प्रतिभावान कलाकाराचा जीव घेतला आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : नोव्हेंबर महिन्यात सुशांत सिंह राजपूत करणार होता लग्न, कुटुंबीयांचा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये होता. त्याने नैराश्यामध्येच आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. ‘छिछोरे’ चित्रपटातून अपयशाने खचून न जाता त्याकडे सकारात्मकतेने कसे पाहायचे. तसेच निराशा, अपयश यामुळे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय चुकीचा आहे हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला होता. पण सुशांतने स्वत:चे आयुष्य त्या मार्गाने संपवले ही त्याच्या चाहत्यांसाठी अनाकलनीय गोष्ट आहे.