अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास बिहार सरकारनं शिफारस केल्यानंतर केंद्रानं हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मात्र, सीबीआयकडे तपास देण्याला महाराष्ट्र सरकारनं विरोध केला आहे. केंद्रानं सीबीआयकडे तपास देणं असंवैधानिक असल्याचं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली असून, “सीबीआय ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले,” असं म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून ‘रोखठोक’ सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलीस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती, पण पोलिसांनी सगळय़ांना तुरुंगात पाठवले. मुंबई पोलिसांनीच २६/११ चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“प्रश्न निर्माण करणाऱ्यांमध्ये मोदी-शाह सुद्धा होते..”

” ज्यांचे सरकार केंद्रात असते, सीबीआय त्यांच्या तालावर काम करत असते. सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआयसारख्या संस्थांवर गेल्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे प्रश्न निर्माण करणाऱ्यांत नरेंद्र मोदी व अमित शहासुद्धा होतेच! गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले? सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असे सकृत्दर्शनी दिसते. हा खून आहे असे जे वारंवार सांगितले जाते त्यास तसा आधार नाही. अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या तव्यावर पोळय़ा भाजू इच्छिणाऱया गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा होता,” असं संजय राऊत म्हणाले.