महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली. सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजचीच निवड का करण्यात आली याचे स्पष्टीकरण दिले.

राऊत म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. २४ तासांपेक्षा कमी वेळात हा ट्रेलर ३० लाखाहूंन अधिक वेळा पाहण्यात आला. येत्या दिवसांमध्ये यात अजून वाढ होत राहणार आहे.’ तसेच या सिनेमासाठी इतर कोणत्या अभिनेत्याचा विचार करण्यात आला होता का या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत यांनी स्पष्ट नकार दिला. राऊत म्हणाले की, ‘जेव्हापासून सिनेमाची बांधणी सुरू झाली तेव्हापासून नवाज हे एकच नाव आमच्या डोळ्यासमोर होते. ‘

अभिजीत पानसे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून पुढच्या वर्षी २३ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. सोनू निगम, महिना चौधरी आणि लेस्ले लेविस यांच्या भारतीय कला महोत्सवात संजय राऊत सहभागी झाले होते. ठाकरे सिनेमाबद्दल बोलताना सोनू म्हणाला की, ‘बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसाठी ज्या अभिनेत्याची निवड झाली आहे, तो अभिनेता आपल्या देशातील उत्कृष्ट अभिनेता आहे. एखाद्या असामान्य कुटुंबातील सदस्याच्या जीवनावर सिनेमाची निर्मिती होते तेव्हा त्याच तागदीचा अभिनय करता येणे आवश्यक आहे. तागदीच्या अभिनेत्यामुळेच सिनेमाला वेगळी ओळख मिळते.’ संजय राऊत यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. सिनेमाची निर्मितीही तेच करणार आहेत तर अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. २३ जानेवारी २०१९ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.