बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा कायमच आपल्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन अवघा काही काळ लोटल्यानंतरच ‘पटाखा’ आणि ‘बधाई हो’ असे लोकप्रिय चित्रपट तिच्या पदरात पडले. इतकंच नाही तर या चित्रपटांमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीतही उतरली. त्यानंतर आता सान्या लवकरच प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्याविषयीचा अनुभव सान्याने नुकताच सांगितला आहे.

शकुंतला देवी या चित्रपटामध्ये सान्या शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकरत आहे. अनुपमा बॅनर्जी असं शकुंतला देवी यांच्या मुलीचं नाव असून सान्याला ही भूमिका मिळाल्यामुळे ती प्रचंड आनंद असल्याचं तिने म्हटलं आहे.

“शकुंतला देवी या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खरंच फार निराळा आणि सुंदर होता. एका प्रतिभावंत व्यक्तीच्या जीवनावर आधारित काम करायला मिळणं हा नशिबाचा भाग आहे. खास करुन असा चित्रपट ज्यात आई-मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात येतो”, असं सान्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, “खरं तर बॉलिवूडमध्ये असं फारसं पाहायला मिळत नाही. परंतु, विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव खरंच छान होता. सेटवर आमची चांगली मैत्री झाली होती. तसंच माझ्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या जिशूसोबत बऱ्याच दिवसाने काम करण्याची संधी मिळाली”.

दरम्यान, शकुंतला देवी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रानी हिंदुस्तानी हे गाणं प्रेक्षकांना विशेष आवडल्याचं दिसून येत आहे.