बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि विनोदाने अनेकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे सतीश कौशिक. ते १० ऑगस्ट १९७९ रोजी पहिल्यांदा मुंबईमध्ये आले होते. आज त्यांना मुंबईमध्ये येऊन जवळपास ४१ वर्षे झाली आहेत. त्यामुळे सतीश यांनी ट्विटर पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

सतीश यांनी शेअर केलेला ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो रेल्वे स्थानकावरील आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी पश्चिम एक्सप्रेसने ९ ऑगस्ट १९७९ रोजी दिल्लीहून निघालो होतो आणि १० ऑगस्ट रोजी सकाळी पोहोचलो आणि मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवले. मुंबईने मला काम, मित्र, पत्नी, घर, ओळख, यश आणि जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोण दिला. ज्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार’ असे म्हटले आहे.

सतीश यांच्या ट्विटवर दिग्दर्शक शेअर कपूर यांनी रिप्लाय दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मासूम चित्रपटाच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटासाठी सतीश हे शेखर कपूर यांना असिस्ट करत होते. तू सेटवर असताना मला एकदा बोलला होतास की जर तूला कोणावर चिडायचे किंवा कोणाला ओरडायचे असेल तर माझ्यावर ओरड. पण त्यावेळी शेखर कपूर यांना कळालेच नाही सतीश असे का म्हणतायेत. तेव्हा सतीश यांनी मी तुझा असिस्टंट आहे हे लोकांना कसं कळणार असे उत्तर दिले होते. सतीश यांचे उत्तर आजही शेखर यांच्या लक्षात आहे.