घराघरात लोकप्रिय झालेल्या झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेला मिळतीजुळती हिंदी मालिका ‘सतरंगी ससुराल’ ३ डिसेंबरपासून झी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता सुरू होणार आहे.
सासू- सून नातेसंबंध किंबहुना भारतीय कुटुंब व्यवस्था अधिक मजबुत रहावी, हाच या कथानकाचा मूळ गाभा असून ‘होणार सून..’चे कथानक थोडय़ा वेगळ्या ढंगात ‘सतरंगी ससुराल’मध्ये पहावयास मिळणार असल्याचे या मालिकेचे लेखक पूर्णेंदू शेखर व झी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख नमित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल या दादी माँ ही भूमिका साकारत आहेत. रविश देसाई, मुग्धा चाफेकर, सादिया सिद्दिकी, भावना बलसावर, सोनाली सचदेव, रेशम टिपणीस, समता सागर व शीतल ठक्कर हे इतर प्रमुख कलावंत आहेत. ‘हम पाँच’ या हिंदी मालिकेत ‘भाई’गिरी करणारी भैरवी रायचुरा या मालिकेची निर्माती आहे.
ही हिंदी मालिका आरुषीवर केंद्रित असून जिचा विवाह विहान नर्मदा वत्सल याच्याशी होतो. विहानला एक नाही तर सात सशक्त व आत्मनिर्भर आईंनी पालणपोषण करून मोठे केले आहे.
आरुषी व तिच्या सात सासवांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रवास म्हणजे ‘सतरंगी ससुराल’ ही हिंदी मालिका आहे. या सर्व सासवांच्या हृदयात फक्त विहानची खुशी आहे. एक सून व तिच्या सात सासवांच्या नातेसंबंधातील एक आगळावेगळा चढ-उतार भारतीय विशेषत: हिंदी दूरचित्रवाणीवर प्रथमच सादर करण्यात आला असल्याचा दावा, या मालिकेचे लेखक पूर्णेंदू शेखर व झी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख नमित शर्मा यांनी केला.
दिल्लीत राहणाऱ्या वत्सल कुटुंबात भारतातील प्रत्येक संस्कृती भिनली आहे, कारण प्रत्येक आई ही विभिन्न पाश्र्वभूमी असलेली, भिन्न व्यक्तिमत्त्वाची आहे. दादी माँ विहानवर गंभीर विचारांचा प्रभाव टाकून जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देणे शिकविते.
विहानची आई भावनात्मक तसेच दुसऱ्यांप्रति संवेदनशीलता शिकविते. बुआ माँ विहानमध्ये अंतर्गत शक्ती निर्माण करते व सत्याच्या बाजूने उभे रहायला शिकविते. चाची माँ त्याच्या आहाराची काळजी घेते व त्याचे खानपान वेळेवर व्हावे याकडे कटाक्षाने लक्ष देते. मिनी माँ फिटनेसप्रेमी असून त्याच्या आरोग्याची काळजी घेते. ताई माँ आध्यात्मिक गुरू असून मासी माँ व्यावसायिक मार्गदर्शक असून करिअरविषयक मार्गदर्शन करीत असते. अशा स्थितीत एका लहानशा मध्यमवर्गीय कुटुंबातील आरुषी जी स्वत:च्या कुटुंबात एकमेव कमावती आहे ती सात आईंच्या या मोठय़ा संयुक्त कुटुंबात स्वत:ला कशी जुळवून घेते, हे मालिकेत पाहायला मिळेल.