आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. गोड आवाज आणि उत्तम गायनशैली यांच्या जोरावर सावनीचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे या चाहत्यांसाठी सावनी कायमच नवनवीन गाणी सादर करत असते. अलिकडेच तिने ‘वंदे गणपती’ हे गाणं सादर केलं असून त्याला श्रोत्यांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाचं निमित्त साधून सावनीने ‘वंदे गणपती’ ही संस्कृत बंदिश गायली. विशेष म्हणजे या बंदिशच्या निमित्तान सावनीची संस्कृतमध्ये गाणं म्हणण्याची इच्छा पूर्ण झाली आहे, असं सावनीने म्हटल्याचं सांगण्यात येतं.

“वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे. पंडित काशीनाथ बोडस यांची ही रचना सतत मनात रूंजी घालत राहिलीय. त्याच बंदिशीला कर्नाटकी शास्त्रीय संगीताची किनार देण्याचं काम माझा मित्र आर. संजय याने केलंय. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना एक सकारात्मक मंगलमय गाणे रसिकांच्या भेटीला घेऊन आले आणि ते रसिकांनी उचलून धरले, याचा आनंद आहे,” असं सावनी म्हणाली.

दरम्यान, या गाण्यावर नृत्यांगना आणि अभिनेत्री अदिती द्रविडने उत्तमरित्या नृत्य सादर केलं आहे. या गाण्याची निर्मिती डॉ. आशिष धांडे यांनी केली आहे. तर सावनी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आतापर्यंत मराठी, गुजराती तमिल, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा सात भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत.