‘सावित्रीजोती’ ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. ही मालिका समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचे नवे भाग येत्या २० जुलै पासून प्रदर्शित केले जातील. दरम्यान ही मालिका आपल्या नव्या प्रोमोमुळे सर्वत्र चर्चेत आहे. ज्योतिराव फुले शस्त्र हाती घेणार की शास्त्र म्हणजेच तलवार हाती घेणार की पुस्तक? असा प्रश्न या प्रोमोतून प्रेक्षकांना विचारण्यात आला आहे.

आजवर ज्योतिरावांचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्य हे सर्वाच्या परिचयाचे आहे. मात्र त्यांच्या सशस्त्र क्रांतीचा संदर्भ प्रेक्षकांसाठी नवा आहे. त्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा नेमका इतिहास काय आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाची सुरुवात ते ज्योतिरावांच्या शिक्षणात येणारे अडथळे आणि विरोध पत्करून त्यांनी घेतलेलं शिक्षण आता अंतिम परीक्षेपर्यंत येऊन थांबले आहे. या टप्प्यावर आलेली ही मालिका लॉकडाउननंतर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या काळादरम्यान इंग्रज सत्तेविरुद्ध जनसामान्यात बंडाला सुरुवात झाली होती. ज्योतिराव ज्या लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालिमीत जायचे, तिथल्या रामचंद्र गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सशस्त्र मार्गाने क्रांती करण्याचे ठरवले. आत्तापर्यंत कुठल्याही अन्यायाविरुद्ध शास्त्राने विरोध करणारे ज्योतिबा या पारतंत्र्याविरोधात शस्त्र घेऊन उभे राहणार का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना ‘सावित्रीजोती’च्या नव्या पर्वात पाहायला मिळेल.