‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी आणावी की नाही हे चित्रपट पाहून ठरवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनावरील स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट बघून त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात कळवण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहताच निर्णय घेतला अशी बाजू निर्मात्यांनी न्यायालयात मांडली. आयोगाने चित्रपट पाहून त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात २२ एप्रिलपर्यंत कळवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र निवडणूक काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही, असं निरीक्षण आयोगाने नोंदवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे.