News Flash

‘पठडीबाहेरील लिखाण करणे आव्हानात्मक’

मालिकांमध्ये सोशिक सून, छळ करणारी सासू किंवा कारस्थानी बाई सर्रास असते.

शिल्पा नवलकर

टीव्हीवर सध्या नायिकाप्रधान मालिकांची चलती असल्याचे पाहायला मिळतेय. या मालिकेत जोपर्यंत नायिका रडत नाही तोवर मालिकेचा टीआरपी वाढतच नाही. पण या पठडीत न बसणाऱ्या एका मालिकेचे लिखाण सध्या अभिनेत्री आणि लेखिका शिल्पा नवलकर करत आहे. ‘गोठ’ या मालिकेच्या पटकथा लिखणाची धुरा शिल्पाने सांभाळली आहे.

याविषयी शिल्पा म्हणाली की, स्टार प्रवाह वाहिनीवरच्या ‘गोठ’ मालिकेतील पटकथा कागदावर उतरवताना लेखक म्हणून माझ्यासमोर भले मोठे आव्हान आहे ते म्हणजे टीव्हीवरील आजवरच्या मालिकांच्या परंपरेविरोधात लिहिण्याचे. मालिकांमध्ये सोशिक सून, छळ करणारी सासू किंवा कारस्थानी बाई सर्रास असते. ही पात्रे जर नसतील तर त्या मालिकेचे दिवस भरलेच म्हणून समजा. पण ‘गोठ’मधील मुख्य स्री पात्र म्हणजे याच्या नेमके उलट आहे. यातील मुख्य पात्र आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडते. कुणी जर आपल्याशी चुकीचे वागत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणारी स्री ‘गोठ’मध्ये दिसते. त्यामुळे ‘गोठ’चे लिखाण माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे, असेही शिल्पाने सांगितले. त्यामानाने नाटक लिहिणे, चित्रपटाच्या कथेचे लिखाण हे खूप सोपे म्हणावे लागेल. पण टीव्हीवरचे लिखाण, तेही मालिकेचे… त्या लेखकांचा कस लागलाच म्हणून समजा. कादंबरी, कथा लिहिली तरी त्याला एक विशिष्ट वाचकवर्ग असतो. पण टीव्ही मालिकांचे तसे नाही. तेथे तुम्हाला छोट्या मुलापासून कॉलेज तरुण-तरुणी, नोकरदार , स्री-पुरुष, गृहिणी ते थेट घरातल्या आजी-आजोबांना पटतील असे विचार, पात्र त्या मालिकेत उभी करायची असतात. शिवाय टीव्ही मालिकांना एपिसोडची डेडलाईन असल्याने तुम्हाला एक एपिसोड वेळीच लिहून द्यावा लागतो, असेही ती म्हणाली.

सध्याच्या टीव्हीवरच्या ट्रेण्डविषयी बोलताना शिल्पा म्हणाली की, आजही हिंदी वाहिन्यांवर टिपिकल सासू-सुनेच्या मालिका सुरू आहेत. पण मराठीत वैविध्यपूर्ण मालिका येत आहेत. हे मराठीचे वेगळेपण म्हणावे लागेल. चित्रपट किंवा नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा पैसे देऊन येत असतो. टीव्ही मालिकांचे तसे नसते. आपण आपली मालिका प्रेक्षकांच्या घरी घेऊन जातो. त्यामुळे सर्वांना आवडेल असे लिखाण करणे ही लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:58 pm

Web Title: serials screenplay writing is challenging says actress writer shilpa navalkar
Next Stories
1 सत्यासाठी आवाज उठविण्याची गरज- अनुष्का शर्मा
2 जाणून घ्या, कपिल शर्माची होणारी बायको गिन्नी छत्राथविषयी…..
3 कपिलने फेसबुकवर शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो
Just Now!
X