सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांसाठी ‘पद्मावती’ चित्रपटाचा अर्ज निर्मात्यांकडे परत पाठवला की, निवडणुकींचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी विचारला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाचा खरपूस समाचार घेतला. सरकारच्या छत्रछायेखाली सर्वांचे दुकान चालू आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही सडकून टीका केली.

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीला पाठिंबा दर्शवत आझमी यांनी ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर म्हणजेच ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन चित्रपटसृष्टीला केले. ‘भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणला येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा,’ असे ट्विट त्यांनी केले.

वाचा : हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने केले ‘पद्मावती’चे समर्थन

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पद्मावती’ वादावर बाळगलेल्या मौनाचा उल्लेखही त्यांनी ट्विटरवर केला. त्यांनी लिहिले की, स्मृती इराणी यांची ‘इफ्फी’साठी मोठी लगबग सुरू आहे. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमुळेच ‘इफ्फी’ला इतकी प्रतिष्ठा मिळाली. तरीही स्मृती इराणी ‘पद्मवाती’च्या वादाविषयी मौन बाळगून आहेत. हा प्रकार म्हणजे, १९८९ साली सफदर हश्मी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने दिल्लीत इफ्फी महोत्सव साजरा करण्याइतकाच निषेधार्ह असल्याचे शबाना आझमी यांनी म्हटले.

सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांची कारणे देत निर्मात्यांकडे चित्रपट परत पाठवल्याने आता १ डिसेंबर रोजी पद्मावती प्रदर्शित होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.