तरुणाईला वेड लावणारा अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ चित्रपट चांगला गाजला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई कायम आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी कायम आहे. दरम्यान या चित्रपटाला ‘अ प्रमाणपत्र’ (A certificate) देण्यात आल्यामुळे १८ वर्षांखालील चाहत्यांना चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. परंतु शाहिदच्या काही जबऱ्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी अजब करामत केली आहे.

‘अ प्रमाणपत्र’ असलेल्या चित्रपटाचे तिकीट बूक करताना नेहमी वयाचा पुरावा मागितला जातो. अशा वेळी १८ वर्षा खालील मुलांना चित्रपटाचे तिकीट खरेदी करता येत नाही. कबीर सिंग पाहण्यासाठी एका चाहत्याने त्याच्या जन्म तारखेतच बदल केला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या आधार कार्डचा फोटो काढून मोबाईलमधील एका अॅपद्वारे जन्म तारखेत बदल केला आणि चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला.

तर दुसऱ्या चाहत्याने देखील अशीच शक्कल लढवली आहे. ‘आम्ही बूक माय शो या अॅपद्वारे चित्रपटाचे तिकीट बूक करत होतो. दरम्यान तिकीट बूक करताना आमच्याकडे १८ वर्ष पूर्ण असल्याचा पुरावा देखील मागितला नाही. चित्रपट गृहामध्ये प्रवेश करताना तेथील रक्षकाने आम्हाला थांबवलेही नाही. परंतु माझ्या मित्राने आम्हाला आधीच कल्पना दिली असल्यामुळे आम्ही आधार कार्डचा फोटो काढून त्यावरील जन्म तारखेत बदल केला होता’ असे एका विद्यार्थ्याने म्हटले आहे.

‘कबीर सिंग’ या चित्रपटामध्ये शाहिदने एका तापट स्वभावाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. ‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंगचे दिग्दर्शन केले आहे.

प्रेक्षकांनी जरी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतले असले तरी काहींनी यामधील शाहिदच्या भूमिकेवर टीका केली आहे. सतत कोणाच्या तरी अंगावर ओरडणे, एका ठरावीक चौकटीतून समोरच्याकडे पाहणारी, त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणारी व्यक्तिरेखा प्रत्यक्षात नाहीच असे म्हणता येत नाही. मात्र त्याच्या वागण्याचे समर्थनही करता येत नाही, असे अनेकांचे मत आहे. दुसरीकडे काहींनी शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम भूमिका असल्याचे काहींचे म्हणणे आहे.