शाहिद कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार आतुरता होती. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये सामिल झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार ‘पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. शाहीदचा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. पद्मावत चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या १९ कोटी रुपयांच्या कमाईला कबीर सिंगने मागे टाकले आहे. २०१९ मधील सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित न होता, पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे तरुणाईला आकर्षण आहे. भारतात या चित्रपटाने शुक्रवारी २०.२१ कोटीची कमाई केली आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट ३१२३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. कियाराने या आधी ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तसेच या चित्रपटात वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे.