बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात शाहिदने एका सर्जनची भूमिका साकारली असून तो दारुच्या आहारी गेल्याचे दिसून येणार आहे. शाहिदच्या अभिनयाच्या करिअरमधील सर्वात कठीण भूमिका असल्याचे शाहिदने सांगितले. या चित्रपटात शाहिद व्यसानाधीन भूमिकेत असल्यामुळे त्याला चित्रीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि विडीचे सेवन करावे लागेल आहे.

‘माझा धुम्रपान करण्याला नेहमी विरोध असतो. पण ‘कबीर सिंग’ चित्रपटातील नायक मोठ्या प्रमाणावर धुम्रपान करणार आहे. त्याची भूमिका निभावणे माझ्यासाठी सोपे काम नव्हेत. एकदा तर अशी वेळ आली की मला दिवसभरात २० सिगारेट ओढाव्या लागल्या. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझ्या शरीराला सिगारेटचा वास येऊ नये म्हणून मी घरी जाण्याआधी दोन तास अंघोळ करायचो’ असे शाहिदने सांगितले.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसत आहे. शाहिदसोबतच कियारा अडवाणीचीही झलक पाहायला मिळणार आहे. प्रेमातला वेडेपणा आणि प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेला कबीर सिंगची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.