अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला. तब्बल २८० कोटी रुपये कमावत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलं. चित्रपटातील शाहिदच्या दमदार अभिनयाचं भरभरून कौतुक झालं. त्याच्या करिअरमधील सर्वांत चांगला परफॉर्मन्स दिल्याचं अनेकांनी म्हटलं. याच चित्रपटासाठी शाहिदला एका पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार होता. मात्र ऐनवेळी आयोजकांनी कार्यक्रमाच्या वेळापत्रकात फेरफार करत शाहिदला पुरस्कार न दिल्याने त्याचा पारा चढला आणि परफॉर्म न करताच तो तेथून निघून गेला.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात शाहिदला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार असल्याचं आयोजकांनी त्याला सांगितलं. या सोहळ्यात त्याचा डान्स परफॉर्मन्ससुद्धा होता. मात्र ऐनवेळी आयोजकांनी कार्यक्रमात बदल करत तो पुरस्कार अभिनेता रणवीर सिंगला दिला. हे पाहून संतापलेल्या शाहिदने पुरस्कार सोहळ्यातून काढता पाय घेतला.

या पुरस्कार सोहळ्याचं शूटिंग नुकतंच पार पडलं असून येत्या काही दिवसांत तो टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात येणार आहे. मात्र शाहिदच्या परफॉर्मन्सऐवजी दुसरा कोण परफॉर्म करेल हे अद्याप वाहिनीने ठरवलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.