प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, डॉ. हाथी, सेक्रेटरी भिडे यांसारख्या कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे ही मालिका घराघरात पोहोचली. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी खास प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता ३ महिन्यांच्या लॉकडाउननंतर ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेची आणि त्यातील कलाकारांची चर्चा रंगू लागली आहे. यातच लेखक तारक मेहता ही भूमिका अभिनेता शैलेश लोढा यांनी साकारली आहे. परंतु, या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी कशी मिळाली याचा एक रंजक किस्सा आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून शैलेश लोढा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत लेखक तारक मेहता ही भूमिका साकारत आहेत. सोसायटीमधील सुज्ञ आणि विनम्र सदस्य, मित्रांच्या मदतीसाठी सतत तत्पर. परंतु, पत्नीच्या डाएट फूडचा कंटाळा येत असतानाही तिच्या प्रेमाखातर ती देईल ते पदार्थ खाणारा प्रेमळ नवरा अशी ही तारक मेहताची व्यक्तिरेखा असून शैलेश लोढा त्याला उत्तमरित्या साकारत आहेत. त्यामुळे मालिकेतील अन्य कलाकारांसोबतच तारक मेहता ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. विशेष म्हणजे शेलैश हे खऱ्या आयुष्यातदेखील एक लेखक आणि उत्तम सूत्रसंचालक आहेत. एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असतानाच त्यांना तारक मेहता या भूमिकेची ऑफस मिळाल्याचं सांगण्यात येतं.

‘तारक मेहता..’ पूर्वी शैलेश छोट्या पडद्यावरील वाह वाह क्या बात है या शोचं सूत्रसंचालन करत होते. याच काळात या कार्यक्रमाचं St. Andrews College या महाविद्यालयात एका लाइव्ह कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात शैलेश लोढा आणि भेट असित मोदी यांची झाली. याच भेटीदरम्यान असित मोदी यांनी शैलेशला तारक मेहताची भूमिका ऑफस केली. विशेष म्हणजे शैलेशनेही या भूमिकेसाठी होकार दिला.

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका २८ जुलै २००८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे जेठालाला, दयाबेन, टप्पू, बापूजी, बबिता, पोपटलाल, भिडे, माधवी भाभी, सोढी,डॉ. हाथी या भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक अतोनात प्रेम करत असल्याचं पाहायला मिळतं.