मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता शशांक केतकर याने फेसबुकवर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. ‘कंगना रणौतचं ऑफिस अनधिकृत? असेलही.. पण मग ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे? आधी परवानग्या कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पक्षावर आरोप नाही किंवा कोणालाच पाठिंबा नाही कारण इथे सगळेच समान भष्ट्राचारी आहेत’, अशा शब्दांत शशांकने राग व्यक्त केला.

शशांकने ही फेसबुक पोस्ट लिहिण्यामागचा उद्देश पुढे सांगितला. २०१३ मध्ये त्याने मिरा रोडला एक फ्लॅट विकत घेतला आणि आता २०२० मध्येही तो अपूर्ण बांधकामाच्या अवस्थेतच आहे. ‘माझी सगळी कागदपत्रे क्लिअर आहेत, तरीही फक्त बोगस बिल्डरमुळे आणि राजकीय वादामुळे आम्ही सगळे फ्लॅटचे मालक हातावर हात धऱून गेली सात वर्षे बसून आहोत. आमच्या मागे खरंच कुठलाच राजकीय पाठिंबा नाहीये, मग आमचं काय आणि फक्त हेच नाही तर जगण्यासाठी रोज स्ट्रगल करावा लागतोय त्या फसवणुकीचं काय’, असा सवाल त्याने उपस्थित केला.

आणखी वाचा : ‘माझ्या कर्णिकाचा काहीतरी पंगा झालाय..’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

‘सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामुळे सुरु झालेलं राजकारण पाहता माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या समस्या कधीच सोडवल्या जाणार नाहीत असं दिसतंय,’ असं त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटलं.