स्थलांतरित मजूर, कामगारांच्या लोंढ्याचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. ‘आपण कोणत्या दिशेला जात आहोत सर’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर व कामगार आपापल्या गावी जाण्यासाठी पायी प्रवास करताना दिसत आहेत.

लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजूर, कामगार हाताला काम नसल्याने आपल्या गावाकडे निघाले आहेत. नोंदणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही मूळ गावी जाण्यासाठी त्वरीत व्यवस्था होत नसल्याने अगतिक झालेल्या परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे महामार्गाने पायीच गावाकडे जात आहेत. काही जण रस्त्याने जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला हात देवून जर वाहन थांबलेच तर रवाना होत आहेत. अन्यथा पायीच जात आहेत. हाच व्हिडीओ शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘जे डोळ्यांना दिसतंय त्यावर विश्वास ठेवा. लोकांचा समूह रस्त्यावर उतरलाय, स्थलांतरितांची ही दयनीय अवस्था आहे. आपण कोणत्या दिशेने पुढे जात आहोत सर?’ करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयश येत असतानाच स्थलांतरितांचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.