“बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात.” असा खळबळजक आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. तिच्या या आरोपामुळे खरंच बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्स घेतात का? असा एक नवा वाद सुरु झाला. या वादात आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने उडी घेतली आहे. सिनेसृष्टीतील काही मंडळींनी मला जबरदस्तीने ड्रग्स देण्याचा प्रयत्न केला होता, असा अनुभव तिने सांगितला आहे.

अवश्य पाहा – “त्यावेळी मी ड्रग्सचं व्यसन करत होते”; कंगना रणौतचा व्हिडीओ व्हायरल

आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र यावेळी ती बॉलिवूडमधील ड्रग्स वादामुळे चर्चेत आहे. “मला धुम्रपानाचं व्यसन होतं. परंतु ऑक्टोंबर २०१७ मध्ये मी धुम्रपान करणं कायमचं सोडलं. मी कधीतरी मद्याचं सेवन करते. परंतु ड्रग्स कधीही घेतलेले नाहीत. सिनेसृष्टीतील काही मंडळी मला ड्रग्स घेण्यासाठी जबरदस्ती करायचे. मी मात्र त्यांना कायम नकार दिला आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करुन शर्लिनने ड्रग्स बाबतचा अनुभव सांगितला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “मी ड्रग्स घेत नाही”; ट्रोल होताच रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीची माघार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.