प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि गायक शामक दावर राणी एलिझाबेथ २ यांना भेटले. बकिंगहम पॅलेसमध्ये झालेल्या भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रमात कमल हसन यांनी हजेरी लावली होती. दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राणी एलिझाबेथ २ यांनी दोन्ही देशांतल्या सांस्कृतिक देवाण घेवाणीबद्दल चर्चा केली तसेच शामकच्या टीमचे कौतुकही केले. राणी एलिझाबेथ यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या डौलदार व मोहकतेचा अनुभव घेता आल्याचे शामकने यावेळी सांगितले.

विशेष म्हणजे यावेळी शामकच्या आई देखील उपस्थित होत्या. शामक व त्याच्या टीमने ड्युक व डचेस ऑफ कॅम्ब्रिजच्या कार्यक्रमात प्रिन्स विल्यम व केट मिडलटोन यांच्या भारत दौऱ्यात आपला परफॉर्मन्स दिला होता, तो अजूनही त्यांच्या लक्षात असून त्यांनी याबद्दल शामकचे कौतुकही केले.

मंगळवारी बकिंगहम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ २ यांनी भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रम २०१७ चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले दिग्गज उपस्थित होते. क्रीडा जगतातून कपिल देव, फॅशन डिझायनर मनीष अरोरा आणि मनीष मल्होत्रा, गायक-अभिनेता गुरदास मान आणि सितार वादक अनुष्का शंकर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.

दरम्यान, कमल हसन यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या भेटी दरम्यान, कमल हसन यांना जुन्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा १९९७ मध्ये ‘मरुधानायगम’ या प्रोजक्टचे उद्घाटन एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कमल म्हणाले की, ‘राणी एलिझाबेथ यांची तब्येत चांगली दिसत आहे’. एलिझाबेथ यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. तिथे खूप लोक असल्यामुळे आम्ही फार कमी वेळीसाठी भेटलो. जेव्हा राणी एलिझाबेथ भारतात आल्या होत्या तेव्हा त्यांनी माझ्या सिनेमाच्या सेटला भेट दिली होती. कदाचीत हे त्यांच्या आयुष्यातील पहिले चित्रिकरण असे जिथे त्यांनी हजेरी लावली होती.

२०१७ मध्ये प्रदर्शित होणारा ‘बाहुबली २’ हा सिनेमा सर्वप्रथम राणी एलिझाबेथ २ यांना दाखवण्यात येणार आहे. ‘बाहुबलीः द कन्क्ल्युजन’ सिनेमाचा प्रिमिअर इंग्लंडमध्ये केला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड सरकारद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात या सिनेमाचे प्रिमिअर ठेवले जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम २७ एप्रिलला आयोजित करण्यात येणार आहे. द ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटद्वारे भारतीय सिनेमे दाखवण्यात येणार आहेत, ज्यात बाहुबली या सिनेमाचाही समावेश आहे.