बॉलिवूडची ‘फिट गर्ल’ अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेसचे किती वेड आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ती कायम तिच्या फिटनेसबाबत सजग असते. त्यामुळेच तिच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योग यांना विशेष स्थान आहे. स्वत: फिट राहण्यासोबतच ती इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. यासाठी तिने योगची सीडी किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे काही धडेही दिले आहेत. काही दिवसापूर्वी शिल्पाने तिचं स्वत:चं फिटनेस अॅपही लॉन्च केलं. विशेष म्हणजे वर्कआऊटला कायम प्राधान्य देणाऱ्या शिल्पाने चक्क १० कोटी रुपयांची एक जाहिरात नाकारल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका आयुर्वेदिक कंपनीने शिल्पाला त्यांच्या स्लिमिंग पिलच्या जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या जाहिरातीसाठी त्यांनी तिला १० कोटींची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर शिल्पाने नाकारली आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये तिने ही ऑफर नाकारण्यामागचं कारण सांगितलं आहे.

“ज्या गोष्टीवर माझा विश्वास नाही त्या गोष्टी मी विकू शकत नाही. या स्लिमिंग पिल्स आणि फेड डाएट्स लगेच परिणाम दाखवण्याचा दावा करतात. मात्र हे लोकांना भूलवण्यासाठी असू शकतं. कोणत्याही पिल्स योग्य डाएट आणि चांगल्या व्यायामाला मात देऊ शकत नाही. त्यामुळे अशा भूलवणाऱ्या जाहिराती मला करायच्या नाहीत”, असं शिल्पाने सांगितलं.

दरम्यान, शिल्पा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र या मधल्या काळात तिने काही फिटनेस सीडी, पुस्तक लॉन्च केले आहेत. ज्यांना चाहत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.विशेष म्हणजे शिल्पा लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल अशी चर्चा आहे. सध्या ती एका रियलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.