एखादा चित्रपट वर्षांनुवर्ष अडकून पडणं ही गोष्ट खरं तर हिंदीला नवीन नाही, मराठी चित्रपटांच्या बाबतीत तर हे आजही सर्रास घडते आहे. त्यामुळे त्याची चर्चा करण्यातही खरं तर मजा नाही. तरीही पाच वर्ष प्रदर्शनाविना अडकून पडलेल्या एक हिंदी चित्रपटाने तमाम चाहत्यांनाच नाही तर खुद्द चित्रपटांतील कलाकारांनाही आश्चर्य करायला लावलं आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा ‘शिमला मिरची’ हा चित्रपट तब्बल पाच वर्षांनी गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे. मुळात रमेश सिप्पी हे एकच नाव चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणायला पुरेसे आहे. ‘शोले’सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शन थांबवले त्यालाच पंचवीस वर्ष लोटली आहेत. निर्माता म्हणून ते कार्यरत राहिले, पण चित्रपट दिग्दर्शनापासून ते दूरच राहिले होते. मात्र त्यांनी ‘शिमला मिरची’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि वितरणासाठी त्यांनी तो ‘व्हायकॉम १८’ समूहाकडे दिला होता. त्यांनी हा चित्रपट पाच वर्ष थांबवून ठेवला होता. अखेर कुठलाही गाजावाजा न करता, त्याहीपेक्षा चित्रपटाचे दिग्दर्शक-कलाकार कोणालाही कळू न देता हा चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित झाला. पाच वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या चित्रपटात राजकुमार राव, रकुल प्रीत सिंग आणि हेमामालिनी हे तीन चांगले कलाकार आहेत. त्यामुळे आता अशा पद्धतीने गुपचुप चित्रपट प्रदर्शित होणे हे त्यांनाही रुचणारे नाही. मात्र काहीच न होण्यापेक्षा तो चित्रपट प्रदर्शित झाला यावरच खुद्द सिप्पींसह सगळ्यांनीच समाधान मानले आहे.

‘हाऊसफुल्ल’ सुपरहिट्स

बॉलीवूडमध्ये नेमके कोणत्या कलाकाराचे कसे चित्रपट यशस्वी होतील, हे गणित बांधणं तसं अवघडच झालं आहे. तरीही दरवर्षी नेटाने निर्मिती, आशय-दिग्दर्शक कोण? आणि कोणता जॉनर प्रेक्षकांना आवडेल? असे अनेक आडाखे बांधून स्टार कलाकार चित्रपट करताना दिसतात. आणि तरीही खूप खर्च करून बनवलेले त्यांचे भव्य बजेटचे भव्य चित्रपट तिकीटबारीवर सपशेल पडतात तेव्हा न जाणो काय-काय पणाला लागते. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून यंदाच्या वर्षी आपली नौका यशस्वीपणे पार करणं फक्त आणि फक्त अक्षय कुमारला साध्य झालं आहे. गेल्यावर्षी एक नाही तर त्याच्या चार-चार चित्रपटांनी सुपरहिट्सची पाटी तिकीटबारीवर मिरवली आहे. तो सामाजिक चित्रपटच करतो, सरकारी संदेश देणारे चित्रपट करतो असे कित्येक आरोप त्याच्यावर झाले असले, तरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून सातत्याने चित्रपट करणे त्याने सुरूच ठेवले आहे. वर्षांच्या सुरुवातीला त्याचा ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऐतिहासिक घटनेवर आधारित या चित्रपटाने १५१.८८ कोटी रुपयांची कमाई केली. पाठोपाठ आलेल्या ‘मिशन मंगल’लाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने तर दोनशे कोटी रुपयांच्या कमाईचा आकडाही पार केला. ‘हाऊसफुल्ल’ ही अक्षयच्या कारकर्दीतील यशस्वी चित्रपट मालिका आहे. त्यामुळे यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल्ल ४’नेही तुफान कमाई केली. आणि २०५.६० कोटी रुपयांची कमाई आपल्या खिशात टाकली. आणि वर्ष संपता संपता प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या चित्रपटाने तर त्याच्या कारकीर्दीसाठीची ‘गुड न्यूज’ही आनंदाने पूर्ण केली. या चित्रपटाने सहा दिवसांत ११७.१० कोटी रुपयांची कमाई केली असून तो चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचतो आहे. त्यामुळे एकटय़ा अक्षयच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर ६७४.७४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.