अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. याप्रकरणी त्यांनी अनेकांची चौकशी केली. मात्र या चौकशीवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार व चित्रपट निर्माते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस इतका वेळ चौकशी का करत आहेत, असा सवाल त्यांनी ‘सामना’तील एका लेखात केला आहे.

‘सुशांतच्या आत्महत्येला जवळपास महिना होत आला आहे आणि तरीसुद्धा त्याबद्दल इतकी चर्चा होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर देशात इतरसुद्धा घटना घडल्या आहेत. मात्र त्यावर कोणाचंही लक्ष जात नाहीये. सुशांतच्या मृत्यूवर संपूर्ण लक्ष केंद्रीत आहे,’ असं त्यांनी या लेखात म्हटलंय.

संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित करत पुढे लिहिलं, ‘सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता आणखी कशाचा तपास बाकी आहे? सुशांत अज्ञातवासात होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती हे तर स्पष्ट आहे. या घटनेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या. संगीत क्षेत्र-घराणेशाही यांचीही हवा निघाली. आता आणखी काय बाकी आहे?’

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत २३ जणांचा जबाब नोंदवला आहे.