बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानसोबत नुकतीच अशी एक घटना घडली ज्यामुळे ती सध्या फार दुःखी आहे. झरीनचा ‘अक्सर २’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. तिच्या या सिनेमाचे प्रमोशन करण्यात ती व्यग्र होती. प्रमोशननिमित्ताने ती दिल्लीला गेली असता काहींनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, ४० ते ५० लोकांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. ते सर्व झरीनसोबत फोटो काढू इच्छित होते. पण काही वेळाने गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन गेले आणि धक्काबुक्कीला सुरूवात झाली. या गर्दीतच तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, झरीनच्या एका जवळच्या व्यक्तीने म्हटले की, दिवसभरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर शेवटच्या कार्यक्रमाला १५ मिनिटांचा संवाद साधण्यासाठी ती आली होती. कार्यक्रमाला जाताना तिथे आवश्यक तेवढी सुरक्षा नसल्याचे तिला कळले. तेव्हाच ४०- ५० लोक तिच्याभोवती गोळा झाले आणि फोटो काढू लागले. फोटो काढण्यासाठी त्यांनी कॅमेरा अगदी तिच्या चेहऱ्यापर्यंत आणला. त्याचदरम्यान तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

असेही म्हटले जाते की, झरीनसोबत ही घटना घडत असताना सिनेमाशी निगडीत कोणताही सदस्य तिच्यासोबत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे झरीन फारच घाबरली. पण ठरलेला कार्यक्रम संपवून ती त्याच दिवशी मुंबईसाठी परतली.

निर्मात्यांनी योग्य सुरक्षा न दिल्यामुळे हा प्रकार घडला असे झरीनचे मत होते. मात्र निर्माते शाम बजाज यांचा मुलगा वरुण बजाज याने मात्र असे काही झाले नसल्याचे सांगितले. ‘झरीनने ठरल्याप्रमाणे कोणतेच कार्यक्रम पूर्ण केले नसून ती प्रमोशनच्या प्रत्येक कार्यक्रमाला नखरेच करत होती. तिच्या अशा नखऱ्यांमुळे आम्हाला फार नुकसान सहन करावे लागले. तिच्यामुळे निर्मात्यांना खूप त्रास सहन करावा लागला,’ असे वरुणने सांगितले.

तर झरीनच्या मते, ‘मी कार्यक्रमाला जात असताना कोणीही मला गाडीपर्यंत सोडायला आले नाही. रात्रभर ते फक्त खाण्यात आणि दारु पिण्यात व्यग्र होते. पण तिकडून मी निघण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र मला थांबवण्यासाठी अनेकजण पुढे आले.’