अभिनेता अतुल अभ्यंकर यांच्या निधनानंतर मालिकांच्या चित्रीकरणाच्या वेळा, कलाकारांची होणारी धावपळ, त्यांचे आरोग्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर शिवसेना चित्रपट सेनेकडून मराठी आणि हिंदीतील सर्व दूरचित्रवाहिन्या आणि निर्मिती संस्थांना निवेदन देण्यात आले आहे. चित्रीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ठेवावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे.
हे क्षेत्र असे आहे की येथे काटेकोरपणे किंवा ठोस नियम करून चालणार नाही. थोडे पुढे-मागे होणारच. पण हे करताना त्याचीही काही मर्यादा असावी, प्रमाणाबाहेर ते होऊ नये. माझ्या स्वत:च्या निर्मिती संस्थेची ‘लक्ष्य’ ही मालिका आहे. मी माझ्याकडून एक नियम आजपर्यंत पाळत आलो आहे.
आमच्या मालिकेचे चित्रीकरण सकाळी ९ ते रात्री ९-९-१५ या वेळेतच चालते. त्यामुळे पॅकअप झाल्यानंतर कलाकार आणि तंत्रज्ञ घरी जाऊ शकतात, असे चित्रपट सेनेचे आदेश बांदेकर यांनी सांगितले. कलाकारांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कलाकाराचे आरोग्य जेवढे सुदृढ राहील, तेवढा तो कलाकार अधिक जोमाने आणि दीर्घकाळ काम करत राहील. कलाकारांनीही स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत, तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घ्यावी, एखादा आजार अंगावर काढू नये, आरोग्य/तब्येतीबाबत किरकोळ तक्रार असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये.
कलाकारांप्रमाणेच मालिकांसाठी काम करणारे तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टिस्ट हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. कलाकारांच्याही अगोदर ही सर्व मंडळी सेटवर येत असतात आणि कलाकारांच्या नंतर सगळ्यात शेवटी ते निघून जातात. त्यामुळे कलाकारांच्या आरोग्याइतकेच या मंडळींच्या आरोग्यालाही तेवढेच महत्त्व आहे, याकडेही बांदेकर यांनी लक्ष वेधले.