सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. त्याच बरोबर तरुणांना वेड लावणारे अनेक नवनवे ट्रेंड देखील येत असतात. त्यातच आता #SettersChallenge हा नवा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडमध्ये अनेकांची पोल खोलली जाते. याच ट्रेंडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने देखील त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

श्रेयसने #SettersChalleng एक व्हिडिओ इन्टास्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयसने सांगितले की ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे शुटिंग संपवून तो आणि त्याचे सहकारी पुण्यावरुन घरी परतत होते. घरी परतत असताना मुंबईतील सायन येथे गाड्यांची तपासणी सुरु होती. त्यामुळे श्रेयसच्या बसला देखील येथे थांबावे लागले. विशेष म्हणजे पोलीस चौकशी दरम्यान त्या भन्नाट अनुभव आल्याचं त्याने सांगितलं. पोलीस तपासणी करत त्याच्या गाडीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रेयसची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान श्रेयसने त्याचं संपूर्ण नाव श्रेयस अनिल तळपदे असं सांगितलं. योगायोगाने अनिल तळपदे असं एका सहाय्यक पोलीस आयुक्तांचं नाव असून श्रेयसच्या वडीलांचं नावदेखील तेच आहे. त्यांमुळे तपासणी करणाऱ्या पोलिसांना श्रेयस हा सहाय्यक पोलिसांचाच मुलगा असल्याचा गैरसमज झाला. परिणामी त्यांनी श्रेयसला सोडून दिलं. विशेष म्हणजे त्या दिवसापासून श्रेयसने त्याचं पूर्ण नाव सांगितल्यानंतर त्याला कधीही अडविण्यात आलेलं नाही.

श्रेयसने सोनी सब वाहिनीवरील ‘माय नेम इज लखन’ या मर्यादीत भागांच्या हिंदी मालिकेत काम केले होते. तसेच या मालिकेत श्रेयस ‘लखन’ या मोठय़ा डॉनसाठी काम करणाऱ्या स्थानिक गुंडाची भूमिका साकारतो आहे. तसेच श्रेयसने ‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वल चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.