सोनी सब वाहिनीवरील ‘माय नेम इज लखन’ या मर्यादीत भागांच्या हिंदी मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे. या भूमिकेविषयी विचारले असता तो म्हणाला, यामध्ये मी ‘लखन’ या मोठय़ा डॉनसाठी काम करणाऱ्या स्थानिक गुंडाची भूमिका साकारतो आहे. आपले जीवन जगण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. पण त्याच्या आयुष्यात अचानकपणे घडलेल्या एका प्रसंगामुळे विलक्षण बदल घडतात. तेव्हापासून एक माणूस म्हणून त्याचा बदलाचा प्रवास सुरु होतो.

चित्रपट किंवा मालिकेत बघतो तसा गुंडाचा लुक या मालिकेत नाहीये. तर उलट तो आजच्या मुंबईकर तरूणासारखा आहे. लखन एकदम उमद्या मनाचा आणि पुरेपूर फॅशनची जाणीव असलेला तरुण आहे. पण त्याची भाषा मात्र त्याच्या पेहरावापेक्षा थोडी हटके आहे, असं श्रेयस म्हणाला.

लखनची आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा दिमाख आणि तोरा असंही श्रेयस सांगतो. त्याच्या व्यक्तिमत्वात काही प्रमाणात चांगुलपणा आहे आणि काही प्रमाणात वाईटपणाही भरलेला आहे. आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत खरी आहे. त्यामुळे त्याच्या वागण्याबद्दल त्याच्या वडिलांना काही आक्षेप असले तरी तो करत असलेली कोणतीही गोष्ट त्या-त्या वेळी प्रेक्षकांनाही बरोबरच वाटेल, असं तो सांगतो.

‘माय नेम इज लखन’ सारखा कार्यक्रम जर माझ्याकडे याआधी कोणी घेऊ न आले असते तर हिंदीमध्ये माझे पदार्पण याआधीच झाले असते. एक अभिनेता म्हणून मला खूप चांगली भूमिका मिळाली आणि भावली तर मी कधीच भाषा, माध्यमे यांची फिकीर करत नाही, असे मतही श्रेयसने व्यक्त केले.