रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ आणि उत्तर रामायण म्हणून ओळखली जाणारी ‘लव कूश’ या दोन्ही मालिकांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता दूरदर्शन वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रामानंद सागर यांची ‘श्री कृष्ण’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ही मालिका देखील प्रेक्षक तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने पाहत असल्याचे म्हटले जात आहे.

‘श्री कृष्ण’ या मालिकेत कृष्ण हे पात्र अभिनेते सर्वदमन डी यांनी साकारले आहे तर बलराम हे पात्र अभिनेते दिपक देऊळकर यांनी साकारले आहे. ‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार दिपक यांना क्रिकेट खेळणे प्रचंड आवडयाचे. दिपक देऊळकर हे एकेकाळी उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून ओळखले जायचे, तसेच त्यांनी मुंबईच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्यांनी काही काळ क्रिकेट खेळणे बंद केले होते. त्यामुळे कॉलेज संपल्यावर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

दिपक यांनी ईटीव्ही वाहिनीवरील ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकेमध्ये महादेव हे पात्र साकारले होते. या मालिकेने त्यांना लोकप्रियता देखील मिळवून दिली होती. तसेच त्यांनी ‘साद’ या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहिली आहे. पण दिपक यांची श्री कृष्ण मालिकेतील बलराम ही भूमिका घराघरात पोहचली होती.

दिपक हे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्याशी लग्न केले आहे.

श्री कृष्ण ही मालिका १९९३ साली प्रदर्शित झाली होती. आता लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रामायण मालिकेच्या वेळात म्हणजे दररोज रात्री ९ वाजता ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. तसेच प्रेक्षकांनी आवडत असल्याचे दिसत आहे.