News Flash

नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे कालवश

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हीरो, अशी त्यांची प्रतिमा होती

(संग्रहित छायाचित्र)

सहा दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी देखणी छबी.. भरदार शरीरयष्टी.. गाण्याची समज..आणि  पु. ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर या महाराष्ट्राच्या अष्टपैलू व्यक्तिवृंदांच्या पंगतीतील नटश्रेष्ठ ही ओळख असलेले श्रीकांत मोघे (वय ९१)यांचे वृद्धापकाळाने शनिवारी राहत्या घरी निधन झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हीरो, अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि स्नुषा अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. गुडघेदुखीचा त्रास होत असल्यामुळे गेली काही वर्षे घरातल्या घरात व्हीलचेअरवर बसून ते नाटकातील स्वगतं आणि कवी सुधीर मोघे यांच्या कवितांचे सादरीकरण करत असत.

श्रीकांत मोघे यांचा नाटक, चित्रपटसृष्टीतील कलाप्रवास प्रदीर्घ होता. सांगलीसारख्या नाटय़कलेच्या उगमस्थळी जन्म झालेल्या श्रीकांत मोघे यांना तिथल्या मातीतील नाटय़ओढीनेच नाटकाकडे आकर्षित केले असावे.  नायकासाठी अनुकूल सगळ्या अनुकूल गोष्टी त्यांना निसर्गत:च लाभल्या होत्या. त्या जोडीला स्वत:बद्दलचा कमालीचा आत्मविश्वास हा यशस्वी होण्यासाठी लागणारा सर्वाधिक महत्त्वाचा गुण त्यांच्यात ओतप्रोत भरलेला होता. म्हणूनच ते म्हणत की, ‘मी जर हिंदी चित्रसृष्टीत गेलो असतो तर धर्मेंद्रच्या तोडीचा नट म्हणून गाजलो असतो.’

मराठी नाटय़सृष्टीत पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्यातील हुन्नर ओळखून त्यांना ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये निमंत्रित केले आणि एका सदाबहार मैफलीचे मराठी रंगभूमीवरचे पर्व रसिकांना अनुभवायला मिळाले. ‘वरात’च्या तुफान यशात मोघेंसारख्या अष्टावधानी कलाकाराचे योगदान लक्षणीय होते. त्यांचे सर्वात गाजलेले नाटक म्हणजे ‘लेकुरे उदंड जाली’! या नाटकाने श्रीकांत मोघे रंगभूमीवर अजरामर झाले. अपत्यसुखास आचवलेल्या जोडप्याचे दु:ख मांडणारे हे नाटक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:25 am

Web Title: shrikant moghe pass away abn 97
Next Stories
1 स्त्रीत्व जपताना..
2 सरधोपट वाट
3 पुन्हा सुगंध पानांचा..
Just Now!
X