प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. पत्नीला मारहाण व मुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात श्वेताची मुलगी पलक हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. सावत्र पित्याने आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या कठीण काळात जे लोक मदतीला आले त्यांचे आभार मानत पलकने पोस्ट लिहिली. ‘काही गोष्टी मला स्वत:ला स्पष्ट करून सांगायच्या होत्या, म्हणून मी ही पोस्ट लिहितेय. फक्त बातम्या वाचून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमेंट करणं खूप सोपं असतं पण त्यांच्या आयुष्यात खरं काय घडलंय हे कोणालाच जाणून घ्यायचं नसतं. माझ्या आईने काय सहन केलं आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहित नाही. त्यामुळे या घटनांबाबत माझं मत सर्वांत अधिक महत्त्वाचं ठरतं,’ असं तिने लिहिलं.

अभिनव कोहलीने पलकला मारहाण केल्याच्या वृत्ताला फेटाळत तिने पुढे लिहिलं, ‘अभिनव कोहलीने माझा शारीरिक छळ कधीच केला नव्हता ना मला त्याने कधी अनुचित प्रकारे स्पर्श केला. मात्र त्याने अनेकदा माझ्यासाठी अश्लील भाषा वापरली. कोणत्याही महिलेने असे शब्द ऐकले असते तर तिलाही त्याची लाज वाटली असती. असे शब्द, अशी भाषा जे एका स्त्रीच्या सन्मानाबद्दल प्रश्न उपस्थित करतील, असे शब्द जे एखाद्या महिलेला कोणत्याच पुरूषाकडून अपेक्षित नसतील, वडिलांकडून तर नक्कीच नाही. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून आमच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल वाचणं खूप सोपं आहे. मुलगी म्हणून गर्वाने सांगू इच्छिते की माझी आई ही माझ्यासाठी सर्वांत आदरणीय व्यक्ती आहे. ती आज जे काही आहे ते तिने स्वकर्तृत्वाने मिळवलं असून आयुष्यात कधीच तिला त्यासाठी पुरुषाची गरज लागली आहे.’

https://www.instagram.com/p/B1Eo9M1noVE/

अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. पलक ही श्वेता व तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. राजावरही दारूच्या नशेत मारहाण केल्याचे आरोप होते. याच कारणामुळे तिने राजाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना अडीच वर्षाचा एक मुलगासुद्धा आहे.

श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती. याशिवाय ‘बिग बॉस ४’ या रिअॅलिटी शोची ती विजेती असून काही चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे.