मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. लवकरच ही जोडी साताजन्माची गाठ बांधणार असून त्यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. लग्नापूर्वीचे सोहळे, विधी ही जोडी एन्जॉय करत आहे. नुकताच या दोघांचा संगीत सोहळा पार पडला असून दणक्यात या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या संगीत सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने त्यांच्या हळद आणि मेंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता या दोघांचा संगीत सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ-मितालीच्या काही मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये या सोहळ्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ-मिताली या दोघांच्या लग्नाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या दोघांनीही त्यांच्या केळवणाचे, हळद, मेंदी, ग्रहमख या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात बांधली जाणार आहे.