‘रंग दे बसंती’ आणि ‘चश्मेबद्दूर’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा तमिळ सुपस्टार सिद्धार्थ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो सतत सोशल मीडियावर बिनधास्तपणे त्याचे मत मांडताना दिसतो. त्याने भाजपा आणि सरकारवर टीका केली होती. आता सिद्धार्थने ट्वीट करत सोशल मीडियावर यूजर्स त्याला ‘साऊथची स्वरा भास्कर’ असे म्हणत असल्याचे सांगितले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केले आहे. ‘हिंदी बोलणारे लोक मला साऊथची स्वरा भास्कर असे बोलत आहेत. मला स्वरा भास्कर म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मला कधीही, केव्हाही आनंदाने स्वरा भास्कर बनायला आवडेल. ती खूप क्यूट आहे’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

Video: ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ; शूटिंग ठप्प

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्याने भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची तुलना दहशतवादी अजमल कसाबशी केली होती. तसेच त्याने भाजप नेत्यांनी त्याचा नंबर लीक केल्याचा देखील आरोप केला होता. “भाजपा सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा” असे त्याने म्हटले होते.