सध्या सिद्धार्थ मल्होत्रा व कतरिना कैफ त्याच्या ‘बार बार देखो’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचीही नवी जोडी प्रेक्षकांनाही आवडत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेली गाणी, सिनेमाचा ट्रेलर सगळ्याच गोष्टींना प्रेक्षकांनी पसंत केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का या सिनेमात कॅट सिद्धार्थबरोबर नाही तर आमिर खानबरोबर रोमान्स करणार होती.
विश्वास बसत नाही ना.. सिद्धार्थला या सिनेमासाठी विचारण्याआधी आमिर खानला विचारण्यात आले होते. आमिर खानला या सिनेमाची संहिताही फार आवडली होती. पण शुटिंगच्या तारखा जुळत नसल्यामुळे त्याला या सिनेमावर पाणी सोडावे लागले. आता आमिर खानचा तोटा झाला असला तरी सिद्धार्थचा मात्र फायदाच झाला. सध्या सिद्धार्थ आणि कतरिना त्यांच्या अनोख्या केमिस्ट्रीने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी ठरले आहेत.
कतरिना आणि आमिरने याआधी ‘धूम-३’ मध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही बघितलेली जोडी होती. ‘धूम-३’ ला प्रेक्षकांनी नाकारले होते. त्यामुळे जुन्या जोड्यांपेक्षा नवीन जोड्यांना घेऊन निर्माते सिनेमा बनवण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत.
ग्लास्गो, दिल्ली, स्कॉटलॅण्ड, मुंबई आणि थायलॅण्डमध्ये या सिनेमाचे शुटिंग झाले आहे. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणाऱ्या ‘बार बार देखो’ या सिनेमाचे दिग्दर्शन नित्या मेहराने केले आहे. रोमॅण्टिक ड्रामा असणाऱ्या या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या बहुप्रतिक्षित सिनेमा एक वेगळेच कथानक हाताळताना दिसणार आहे. या सिनेमाआधी सिद्धार्थ ‘कपूर अॅण्न्ड सन्स’ या सिनेमात दिसला होता, तर कतरिना ‘फितूर’ या सिनेमातून झळकली होती. आता हे दोन्ही कलाकार ‘बार बार देखो’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर येणार असल्यामुळे बॉलीवुडमध्ये एका नव्या जोडीची भर पडणार आहे. कतरिना आणि सिद्धार्थची ‘सिझलिंग केमिस्ट्री’ असणारा ‘बार बार देखो’ हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.