अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललं आहे. मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीसदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुशांतविषयी काही खुलासे केले आहेत. “जानेवारी महिन्यात सुशांत फारच निराश होता. त्याचं या जगात कोणीच नाही असं म्हणत होता. शहरापासून लांब खेड्यात शेती करायची इच्छा त्याने बोलून दाखवली होती”, असं सिद्धार्थने सांगितलं.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला की सुशांतने त्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉल केला होता. “कृपया तू परत ये. आपण दोघं मिळून काहीतरी करू शकतो. मला अभिनयात रस नाही. आपण दुसऱ्या क्षेत्रात काहीतरी एकत्र करू शकतो. यासाठी तू योग्य व्यक्ती आहेस असं मला वाटतं. तुझी नोकरी सोडून दे. मी तुला तितकाच पगार देईन”, असं सुशांत सिद्धार्थला म्हणाल्याचं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते”; अंकिता लोखंडेने सांगितलं कारण

सुशांतशी बोलणं झाल्यानंतर सिद्धार्थ मुंबईला आला आणि जेव्हा तो सुशांतच्या घरी पोहोचला तेव्हा सुशांत अक्षरश: रडत होता. “माझ्याजवळ आता कोणीच नाही असं म्हणत सुशांत ढसाढसा रडत होता. तू माझ्यासोबत राहा. तुझ्या कुटुंबीयांची काळजी मी घेईन, असं तो म्हणत होता. आपण पवनाला जाऊया”, असं सुशांतने म्हटल्याचं त्याने पुढे सांगितलं. पवनामध्ये सुशांतचा फार्महाऊस आहे आणि त्याठिकाणी तो ट्रेकिंगला, सायकलिंगला जात असे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर त्याचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री व सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांत रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.