देशभरामध्ये आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सध्याच्या काळाच देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेक बहीण-भावांची भेट होऊ शकत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. यामध्येच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लता मंगेशकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी आणि लता मंगेशकर यांचे काही फोटो कोलाज करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये लता मंगेशकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी भाऊ मानत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी माझा नमस्कार. आज मी तुम्हाला राखी पाठवू शकत नाही. त्यामागचं कारण सारं जग जाणतंय. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी इतकी चांगली कामं केली आहे आणि इतक्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत ज्या कधीच कोणी विसरु शकत नाही. आज देशातील असंख्य स्त्रिया तुम्हाला राखी बांधण्यासाठी प्रयत्न करत असतील. मात्र ते अशक्य आहे. परंतु, तुम्ही समजू शकता आणि आजच्या दिवशी आम्हाला एक वचन द्या की तुम्ही देशाचं नाव अजून मोठं कराल. धन्यवाद”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

“त्यांच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रिट्विट करत उत्तर दिलं आहे. लता दीदी, रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी तुम्ही दिलेला संदेश नक्कीच प्रेरणा देणारा आहे. देशातील स्त्रियांच्या आशीर्वादाने नक्कीच आपला देश यशाचं शिखर सर करेल आणि कायमच नवीन यश संपादित करेल”, असं रिट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, सध्या लता मंगेशकर यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.