‘जग घुमेयाँ’ आणि ‘दिल दिया गल्लाँ’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांची गायिका नेहा भसिनने लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव सांगितला. वयाच्या दहाव्या वर्षी विनयभंग झाल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. ती घटना आठवली की आजही मन अस्वस्थ होत असल्याची भावना तिने व्यक्त केली.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितलं, “मी दहा वर्षांची होते. तेव्हा हरिद्वार याठिकाणी होते. माझी आई माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. अचानक एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी घाबरले आणि तिथून पळाले. त्यानंतर काही वर्षांनी एका हॉलमध्ये अशीच घटना पुन्हा घडली. या घटना मी कधीच विसरू शकत नाही. मला आधी वाटायचं की माझीच चूक आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावरही अपशब्द, आक्षेपार्ह भाषा वापरून लोकांना त्रास दिला होता. मला हा चेहरा नसलेला दहशतवादच वाटतो.”

एका दुसऱ्या गायकाबद्दल मत व्यक्त केल्यानंतर नेहा भसिनला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचा अनुभव सांगत ती पुढे म्हणाली, “मी फक्त इतकंच म्हटलं की मला तो बँड आवडत नाही आणि तेव्हापासून मला ट्रोल केलं जाऊ लागलं. बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. आता मी गप्प बसणार नाही. मी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली आहे.”