‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात या आठवड्यात लोकसंगीत विशेष भाग रंगणार आहे. यावेळी स्पर्धक लोकगीतं सादर करणार आहेत. पोवाडा, अभंग, लावणी, भारूड असे लोकसंगीताचे विविध प्रकार या मंचावर सादर होणार आहेत.

अंशुमन ‘विंचू चावला’ हे भारूड सादर करणार आहे. अर्चना लावणी सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल तर यशोमान आपल्या अभंगातून सर्वांना नरसोबाच्या वाडीचं दर्शन घडवेल. संकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा गाणार असून या पोवाड्याने मैफिलीचा रंगच बदलणार आहे. गिरीजाच्या गवळणीनंही सर्वांची मनं जिंकली आहेत.

‘सिंगिंग स्टार’ लोकसंगीत विशेष भाग ९ आणि १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसले तरी आपल्या प्रत्येकाच्याच मनात गाण्याचे बोल गुणगुणत असतात. असेच काहीसे कलाकारांच्या बाबतीतही असते. रोजच्या व्यग्रतेमुळे त्यांना गायनाची आवड जोपासणे शक्य होत नाही, तर काहींना संकोचही वाटतो. याच कलाकारांच्या मनातील गुपिताला सोनी मराठीने वाट करून दिली आहे. ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात कलाकार गाणे गात असून त्यांच्या सोबतीला दिग्गज गायकही आहेत. कलाकार आणि गायक अशी जोडी असणाऱ्या या कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ नट प्रशांत दामले, संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी, गायिका बेला शेंडे करत आहेत, तर अल्पावधीतच स्वत:ची छाप पाडत मनामनांत घर केलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे सूत्रसंचालन करत आहे.