आनंद एल राय निर्मित तुंबाड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थरार आणि रहस्याने परिपूर्ण अशा चित्रपटामध्ये अभिनेता सोहम शाह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आगामी ‘तुंबाड’ चित्रपटात अभिनेता सोहम शाहने महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राह्मणाची भूमिका केली असून ही व्यक्तीरेखा साकारताना त्याला खूप मेहनत करावी लागल्याचं समोर आलं आहे.

चित्रपटाच्या कथेनुसार सोहमला भर पावसात एक महत्त्वाचा भागाचं चित्रीकरण करायचं होता. या भागाचे चित्रीकरण जवळपास महिनाभर सुरु होतं. इतकंच नाही तर यावेळी सतत पाऊस सुरु होता. मात्र तरीदेखील सोहमने भर पावसात चित्रीकरण सुरु ठेवलं. याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला.

‘काही महिन्यापासून आम्ही पावसात चित्रीकरण करत होतो. मात्र या भागाचे चित्रीकरण पूर्ण करणे गरजेचे होते. त्यात खंड पडून चालणार नव्हता. या सतत पावसात काम केल्यामुळे माझी प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे पुन्हा आता अशा पावसात काम करण्याची वेळ माझ्यावर येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करत होतो, असं सोहम म्हणाला.

‘तुंबाड’ची कथा १९२० च्या काळातील पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.