पुस्तक हे माणसांचे सच्चे दोस्त असतात असं म्हणतात. पुस्तकांच्या सानिध्यात आपण बरंच काही शिकून जातो. स्वत: पुस्तकांच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही हे मनापासून पटलं आहे. त्यामुळे कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली सध्या पुस्तकांच्या सानिध्यात वेळ व्यतीत करत आहे. १० ऑगस्ट हा बुक लव्हर डे म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच सोनालीनं इन्टाग्राम पोस्टमधून तमाम पुस्तकप्रेमींना Book Lovers Dayच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली स्वत: पुस्तकप्रेमींसाठी बुक क्लब चालवत आहे. सोशल मीडियावर देखील या बुक क्लबद्वारे हजारो पुस्तकप्रेमी जोडले गेले. तेव्हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुस्तक प्रेमी सोनालीनं तिच्यासारख्या असंख्य पुस्तक प्रेमींना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये असून, हायग्रेड कॅन्सरवर ती उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरनं केलं. त्यानंतर उपचार घेण्यासाठी ती अमेरिकेत गेली.

गेल्याच आठवड्यात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिनं एक फोटोही शेअर केला होता. कॅन्सरच्या उपचारांसाठी तिनं पूर्णपणे केसंही कापले. ‘हल्ली मला तयार होण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी आहे. कारण आता केस विंचरण्यात माझा वेळ वाया जात नाही’, असं तिने लिहित आपला फोटो शेअर केला होता. खरं तर सोनालीला अशा अवस्थेत पाहायला मिळेल असा विचार तिच्या चाहत्यांनी कधीच केला नव्हता, मात्र आता या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचं बळ देव तूला देवो अशी प्रार्थनाही चाहत्यांनी तिच्यासाठी केली आहे.