मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर गायक सोनू निगमवर अनेकांनी आगपाखड केली. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारा लाउडस्पीकरचा वापर यावर सोनू निगमने केलेले ट्विट हे संविधानाचा अनादर करणारे आहे. त्यामुळे त्याने भारत सोडण्याचा विचार करायला हवा, असे मत पश्चिम बंगाल अल्पसंख्यक संयुक्त परिषदेचे उपाध्यक्ष मौलवी सय्यद शाह यांनी व्यक्त केले.

मौलवी म्हणाले की, सोनू निगमने अजानवर भाष्य केल्याने अनेक भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याने लवकरात लवकर सर्वांची माफी मागावी. नाहीतर दहा लाख रुपयांचे बक्षिस मिळवण्यासाठी मी दिलेल्या इतर अटीही पूर्ण कराव्यात. सोनू निगमने मुंडन करून घेतलेय. पण, मी सांगितलेल्या अजून दोन अटी त्याने पूर्ण करणे बाकी आहे. त्याने गळ्यात चपलांचा हार घालावा आणि संपूर्ण देशभर फिरावे असेही मी सांगितले होते. जेव्हा तो या दोन्ही अटी पूर्ण करेल तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद बोलावून त्याला चेक देईन.

तत्पूर्वी, चहुबाजूंनी होणारी टीका आणि मौलवीच्या धमक्यांमुळे सोनू निगमने बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. यावेळी मौलवींनी दिलेल्या धमकीचा निषेध करत त्याने भर पत्रकार परिषदेत मुंडनही करवून घेतले. पण, केस कापून घेण्यापूर्वी त्याने आपले ट्विट हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, हे पुन्हा स्पष्ट केले. लाउडस्पीकर कोणत्याही धर्माचा भाग नसल्यामुळे त्याची गरज नाही, असा पुनरूच्चार त्याने केला. ‘लाउडस्पीकरवरून होणारी अजान ही गुंडगिरी आहे, असे मी म्हटले. माझ्या या एकाच विधानाला उचलून धरले गेले. मात्र मी केवळ मशिदींबद्दल बोललो नाही. मंदिरे आणि गुरूद्वारांचाही उल्लेख माझ्या ट्विटमध्ये केला होता. त्याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले’ असा आरोप त्याने यावेळी केला.