छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘इंडियन आयडल’कडे पाहिले जाते. सध्या इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु असून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. पण त्यांनी हजेरी लावलेला एपिसोड प्रदर्शित होताच अमित यांनी शोवर टीका केली होती. त्यानंतर अनेकांनी अमित कुमार यांना सुनावले होते. पण गायक सोनू निगमने मात्र अमित कुमार यांना पाठिंबा दिला आहे.

सोनू निगमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की ‘गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडलवरुन वाद सुरु होते. मी शांत बसलो होतो. पण मला असे वाटते की मला आता बोलायला हवे. काही दिवसांपूर्वी अमित कुमार आले. ते खूप मोठे गायक आहेत आणि किशोर कुमार त्यांचे वडील. मला असे वाटते की त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे.’

आणखी वाचा : ‘धक्कादायकच, कारण…’, अमित कुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

पुढे सोनू निगम म्हणाला, ‘अमित कुमार हे एकदम साधे आणि सरळ व्यक्ती आहेत. ते काही बोलत नाहीत याचा फायदा घेतला जात आहे. मी इंडियन आयडलच्या टीमला सांगू इच्छितो की आता हे प्रकरण इथेच थांबवायला हवे. यामध्ये इंडियन आयडल किंवा अमित कुमार यांची चूक नाही. या प्रकरणात आदित्य आणि मनोज यांची चूक आहे. कारण ते मध्ये येऊन या प्रकरणावर बोलत आहेत. तुम्ही सर्वांनी अमित कुमार यांचा आदर करायला हवा कारण ते इंडस्ट्रीमधील सीनीअर लोकांपैकी एक आहेत.’

हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘इंडियन आयडल आणि अमित कुमार यांच्याशी संबंधीत मी एक संदेश सर्वांना देऊ इच्छितो. तसेच किशोर कुमार यांना अमित कुमार यांच्यापेक्षा चांगलं कोणी ओळखत नव्हतं’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

काय म्हणाले होते अमित कुमार?
अमित कुमार यांनी हजेरी लावलेल्या एपिसोडमध्ये परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते’ असे म्हटले होते.